‘रक्तदान हेच श्रेष्ठदान, रक्तदानातून जीवनदान’; रामनाथ येथे विविध संस्थांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम
अलिबाग :
मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर जवानांना आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना अभिवादन करण्यासाठी रामनाथ, अलिबाग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहीदांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत जीवनदानाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अमृत रायगड जिल्हा कार्यालय, सन्मित्र मंडळ, एक्स एनसीसी कॅडेट्स असोसिएशन तसेच कुलाबा ढोल-ताशा व ध्वज पथक यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जिवंत ठेवतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचा उद्देश या उपक्रमातून साध्य करण्यात आला.
२६/११ च्या हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा उपक्रम केवळ स्मरणापुरता मर्यादित न राहता रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देणारा ठरला. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान, रक्तदानातून जीवनदान!’ हा प्रेरणादायी संदेश देत आयोजकांनी समाजातील नागरिकांना रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.