अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पीडितांना नुकसानभरपाई तातडीने द्या- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे 

0
6
अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पीडितांना नुकसानभरपाई तातडीने द्या- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे 
अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पीडितांना नुकसानभरपाई तातडीने द्या- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे 

अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पीडितांना नुकसानभरपाई तातडीने द्या- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे 

प्रलंबित प्रकरणांचा घेतला आढावा; दोषारोपपत्र विहित वेळेत सादर करण्याचे पोलीस विभागाला आदेश

सिंधुदुर्ग :
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत अत्याचारग्रस्त पीडित व्यक्तींना देय असलेली नुकसानभरपाई आणि आर्थिक सहाय्य तातडीने वितरित करावे. तसेच संबंधित प्रस्तावांवर शासनाच्या प्रचलित नियम व तरतुदींनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत जिल्ह्यात दाखल झालेल्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकरणांची सद्यस्थिती, पोलीस तपासावरील प्रलंबित प्रकरणे आणि पीडितांना मिळणारे अर्थसहाय्य यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे, सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता यांचे प्रतिनिधी वर्षा प्रभू, पोलीस निरीक्षक (नाहसं) ज्योती चव्हाण, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे प्रतिनिधी समिधा ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, समितीचे प्रभारी सदस्य सचिव तथा विशेष अधिकारी तुषार गवळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्ह्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत आजपर्यंत दाखल झालेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. पोलीस तपासावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांची सद्यस्थिती जाणून घेत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी पोलीस विभागाला संबंधित प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र विहित कालमर्यादेत सादर करण्याच्या सूचना दिल्या.
समितीचे प्रभारी सदस्य सचिव यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त, पोलीस तपासावर प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच पीडित व्यक्तींना वितरित करण्यात येणारे आर्थिक सहाय्य याबाबतची माहिती समितीसमोर सादर केली. तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खून प्रकरणांमध्ये मृत व्यक्तींच्या वारसांना शासकीय नोकरी अथवा निवृत्तिवेतनाचा लाभ देण्यासंदर्भातील प्रस्तावांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
अत्याचारग्रस्त व्यक्तींना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत विलंब होऊ नये, तसेच त्यांना शासनाकडून देय असलेले आर्थिक सहाय्य वेळेत मिळावे, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि नियमानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here