CJP च्या आंदोलनाला आज दुसरा दिवस; मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच

0
3

CJP च्या आंदोलनाला आज दुसरा दिवस; मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच

नवी दिल्ली, दि. २२ : NEET-UG परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या CJP (Cockroach Janta Party) च्या आंदोलनाने सोमवारी आणखी तीव्र रूप धारण केले. जंतर-मंतर येथे हजारो विद्यार्थी, पालक आणि समर्थकांनी धरणे आंदोलनात सहभाग घेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर कठोर टीका केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.
आंदोलनस्थळी मूलभूत सुविधांचा प्रश्नही उपस्थित झाला असून आंदोलनकर्त्यांनी पाणीपुरवठा खंडित झाल्याचा आरोप केला आहे. याबाबत प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी CJP ने केली आहे. आंदोलनकर्त्यांनी सलग दुसऱ्या रात्रीही जंतर-मंतर येथे ठिय्या आंदोलन सुरू ठेवले.
देशभरातील विविध राज्यांतून आलेले विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि पालक यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी व्यापक धोरण जाहीर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. CJP ने यापूर्वी पुण्यातून देशव्यापी जनजागृती मोहिमेला सुरुवात केली होती. त्यानंतर जयपूर, लखनौ, अमृतसर, बेंगळुरू यांसह विविध शहरांत आंदोलनांची मालिका आयोजित करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, परीक्षा प्रक्रियेतील वारंवार होणाऱ्या त्रुटींमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे केवळ चौकशी न करता जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा राबविण्यात याव्यात.
दरम्यान, दिल्ली प्रशासन आणि पोलिसांकडून आंदोलनस्थळी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. CJP ने मात्र आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here