करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर धारावीत करोना रुग्णांची संख्या गेल्या वर्षी झपाट्याने वाढली होती. चिंचोळ्या गल्लय़ांमध्ये खेटून असलेल्या झोपडय़ा आणि एकेका झोपडीत आठ ते दहा लोकांचे वास्तव्य असलेल्या धारावीत संक्रमण कसे रोखायचे असा गहन प्रश्न पालिकेपुढे होता. धारावी हा परिसर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीचा भाग असल्याने करोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला. पालिकेची यंत्रणा सतर्क झाली आणि ज्या उपाययोजना केल्या त्याला धारावी मॉडेल म्हणून जगभरात ओळख मिळाली.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत ८ एप्रिल रोजी धारावी येथे एकाच दिवसात सर्वाधिक ९९ करोना रुग्णांची नोंद झाली होती. पुन्हा एकदा धारावीत एकाही करोना रुग्णाची नोंद झालेली नाही.धारावीने दुसऱ्या लाटेला थोपवल्याचे चित्र दिसत आहे. चार महिन्यानंतर पहिल्यांदा धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
“हे मुंबई महापालिकेचं यश आहे. याबद्दल धारावीकरांचं स्वागत करायला हवं आहे. ७ वेळा धारावी शून्यावर आली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केलं. त्याला लोकांनी योग्य प्रतिसाद दिला. धारावी शून्यावर आली तरी पुढे नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. धारावीकर आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी करुन दाखवलं आहे” किशोरी पेडणेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या.