कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव (२०२१) साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.‘ब्रेक दि चेन’च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंध पातळीबाबत (Level of Restrictions for Break the Chain) वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.