वेंगुर्ला प्रतिनिधी- हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, वृक्षतोड, प्लॅस्टीकचा अतिवापर आणि जैवविविधतेचा -हास याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्ष ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे आज बुधवारी सायकल रॅली व शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. https://sindhudurgsamachar.in/kokan-भिकाजी-साटेलकर-यांचे-निध/
सकाळी नगरपरिषद कार्यालय ते दाभोली नाका, शिरोडा नाका, बॅ.नाथ पै रोड, पॉवर हाऊस, कॅम्प, म्हाडा वसाहत, जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत सायकलींवर पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृतीपर संदेश लिहिलेले फलक लावण्यात आले होते. त्यानंतर गोळीबार मैदान येथे देशी प्रजातींच्या अंदाजे १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. मुख्याधिकारी परितोष कंकाळ, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, वेंगुर्ला सायकल ग्रुप वेंगा बॉईजचे डॉ.प्रल्हाद मणचेकर, नित्यानंद आठलेकर, विश्राम घाडी, संदिप परब यांच्यासह नागरिक, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना झाडाचे रोप भेट देण्यात आले.
या कार्यक्रमानंतर बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थीनींनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेसमोर पर्यावरण बदलाविषयी विविध घटकांवर माहिती देणारे तसेच प्लॅस्टिक बंदी, प्लॅस्टिकच्या अति वापराचे दुष्परिणाम, कांदळवन संवर्धनाचे महत्त्व सांगणारे पथनाट्य सादर केले. उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा‘बाबत शपथ घेतली.
शहरातील विविध भागात ५०० वृक्षांची लागवड करण्याचे नियोजित आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आपल्या परिसरात जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करावी असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.
फोटोओळी – १) पर्यावरण दिनी सायकल रॅली काढण्यात आली.
२) कॅम्प येथे शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली.