रत्नागिरी- महायुतीकडून कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण ऊर्फ भय्या सामंत आणि प्रमोद जठार ही नावे चर्चेत असतानाच आता सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव या लोकसभा मतदारसंघासाठी समोर आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-पर्ससीन-मासेमारीला-आजपा/
रवींद्र चव्हाण यांच्या नावामुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. अशातच भय्या सामंत यांनी ‘मी किरण रवींद्र सामंत… रोकेगा कौन ?’ अशी व्हाॅट्सअप स्टेटसलाईन ठेवल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या, पण आता रवींद्र चव्हाण हे आपले मोठे बंधू आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास आपण काम करू, असे माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे. त्यामुळे किरण सामंत यांनी माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘सार्वजनिक बांधकाममंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली तर मी त्यांचा प्रचार करेन. चव्हाण हे महायुतीमधील एक घटक आहेत. वरिष्ठ पातळीवरून जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य असेल,’ अशी पुस्तीही किरण सामंत यांनी जोडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजितदादा पवार आणि वरिष्ठ पातळीवरील सर्व मंडळी जो देतील तो उमेदवार मला मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गात नारायण राणे यांची ताकद आहे. त्यामुळे रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.
महायुतीचा उमेदवार ठरवताना केंद्रीयमंत्री नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, आमदार शेखर निकम या सगळ्यांचा विचार घेऊनच महायुतीचा उमेदवार अंतिम केला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आता या सगळ्या विषयावर शिवसेना, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणती प्रतिक्रिया येते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.