Maharashtra: भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांचे निधन

0
73

पुणे: पुण्याच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, मुक्ताताई या भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. सुमारे 30 वर्ष त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी शहरात विविध विकासकामांना चालना दिली होती. विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कर्तव्यांना प्राधान्य दिले. अलीकडेच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी आजारपणातही मतदानात सहभाग नोंदवून लोकशाहीवरील आपली निष्ठा तसेच पक्षाचा उमेदवार जिंकलाच पाहिजे, यासाठी पक्षनिष्ठा दाखवून दिली होती. मी त्यांना या आजारपणात न येण्याची विनंती करूनसुद्धा त्या दोन्ही निवडणुकीत रुग्णालयातून मतदानाला आल्या होत्या. पुण्यात विविध सामाजिक कामे करताना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याला त्यांचे प्राधान्य होते. या कठीण प्रसंगात आम्ही सारेच त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here