मुंबई – महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-शेजाऱ्यांशी-झालेल्या-व/
आजच्या दिवशी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्रासाठी मंगल कलश आणला. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांना संघर्ष करावा लागला आणि मुंबईसह महाराष्ट्र निर्माण करणे आणि कर्नाटकात गेलेली गावेही महाराष्ट्रात असावी हा तेव्हापासून आजपर्यंतचा आग्रह आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्राची निर्मिती करताना अनेकांनी बलिदान दिले, मोठा संघर्ष केला. महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या पायवाटेने चालण्याचा प्रयत्न केला आहे. जगात सर्वात प्रगत देश अमेरिका आहे, त्या देशाने सर्वांचे स्वागत केले तसेच मुंबई शहरानेही जगाच्या पाठीवर सर्वांचे स्वागत केले आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातील इतर राज्यांपेक्षा पुढे होते. पण अलीकडे काही दिवसांपासून राज्यकर्त्यांमधील राज्याप्रतीची निष्ठा, अभिमान लोप पावला का? अशी शंका वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
ज्या कारणाने महाराष्ट्राची स्थापना झाली ते कारण पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी एकत्रित येऊन संघर्ष करण्याची गरज आहे. त्यामुळे आजच्या महाराष्ट्र दिनाला विशेष महत्त्व आहे. तसेच कामगार दिनालाही तेवढेच महत्त्व आहे. देशात केंद्र सरकारने कामगारांसाठी बदललेले नियम पाहिले तर कामगारांसाठी कोणतेही संरक्षण राहिलेले नाही. यासाठी कामगार चळवळ पुन्हा एकदा जागरुक करण्याची गरज आहे. यासाठी पक्षाच्या कामगार सेलचे अध्यक्ष खटकाळे प्रयत्न करत आहेत. कामगारांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढचे पाऊल टाकणे आवश्यक आहे, असे आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
राज्यातील कामगार संघटीत करणे आणि त्यांच्या मागे खंबीर राहणे त्याशिवाय कृषी कायद्याप्रमाणे कामगारांविषयी जे कायदे करण्यात आले आहेत त्याची लोकजागृती करून आवाज उठवण्याचे काम भविष्यात करायचे आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्राची निर्मिती करताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी मूल्ये घालून दिली तीच मूल्ये पुढे नेण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका आपल्या सर्वांमध्ये असायला हवी अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
त्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सध्या कोकणातील रिफायनरी संघर्षाची गोष्ट मनाला वेदना देत आहे. विकास हा झालाच पाहिजे पण स्थानिक लोकांना ज्या पद्धतीची वागणूक मिळत आहे ती मराठी संस्कृती नाही. असा अन्याय जर महिलांवर आणि कष्टकऱ्यांवर होत असेल तर त्याचा जाहीर निषेध झालाच पाहिजे, असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
तसेच आजच्या दिवसानिमित्त राज्य सरकारने चर्चेला बसावे, अशी विनंती सुप्रियाताई सुळे यांनी केली. चर्चेतून मार्ग निघतात. आपल्याला मिळालेल्या संविधानाच्या चौकटीत राहून राज्य सरकारने कोकणातील बांधवांना विश्वास द्यावा. त्यानंतर हा प्रकल्प पुढे घेऊन जावे. थोडा संवेदनशीलपणा राज्यसरकारने दाखवायला हवा, अशी अपेक्षा सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केली.
यावेळी कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, सेवा दल प्रदेशाध्यक्ष जानबा म्हस्के, सेवा दल कार्याध्यक्ष राजेंद्र लावंघरे, मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेल सुभेदार, आयटी सेल राज्यप्रमुख नीरज महांकाळ, युवक उपाध्यक्ष अमोल मातेले तसेच इतर पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.