NEET आंदोलनातील तरुणाईचा विजय; जिद्दीने सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडले – खासदार शरद पवार
NEET आंदोलनातील तरुणाईचा विजय; जिद्दीने सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडले – खासदार शरद पवार
नवी दिल्ली, दि. २५ :
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सलग २८ दिवस आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या संघर्षाचे खासदार शरद पवार यांनी कौतुक केले आहे. तरुणाईने दाखवलेली जिद्द आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची भूमिका ही लोकशाहीच्या बळाचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले.
शरद पवार यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंदोलनकर्त्यांच्या सातत्यपूर्ण आणि आग्रही मागणीनंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहत सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या सामर्थ्याचे प्रतीक असून, देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा हा मोठा विजय आहे.
तसेच, या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी आणि खासदारांनी देशातील युवकांना नैतिक तसेच संसदीय पाठबळ दिल्याबद्दल त्यांनी सर्व विरोधी पक्षातील खासदारांचे आभार मानले.
देशातील लोकशाही अधिक सक्षम होत असल्याचे नमूद करत, या परिवर्तनाचे सर्वाधिक श्रेय देशातील युवा पिढीला जाते, असेही शरद पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.