Ratnagiri Local Holiday 2026: दिवाळीनिमित्त ९ नोव्हेंबरला शासकीय कार्यालयांना सुट्टी
Ratnagiri Local Holiday 2026: दिवाळीनिमित्त ९ नोव्हेंबरला शासकीय कार्यालयांना सुट्टी
रत्नागिरी :
दिवाळीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या स्थानिक सुट्टीत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी धनत्रयोदशीसाठी जाहीर केलेली सुट्टी रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी यासंदर्भात सुधारित आदेश जारी केला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयाने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सन २०२६ मधील स्थानिक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली होती. या यादीतील अनुक्रमांक ३ वर नमूद असलेल्या ६ नोव्हेंबरच्या धनत्रयोदशीच्या सुट्टीत आता बदल करण्यात आला आहे.
सुधारित आदेशानुसार, ६ नोव्हेंबर २०२६ ऐवजी ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टी लागू राहील. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील संबंधित शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या सुट्टीचे नियोजन या नव्या आदेशानुसार करण्यात येणार आहे.