ओरोस: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या वतीने होणाऱ्या जिल्हा कृषी महोत्सवासंदर्भात पूर्व प्राथमिक चर्चेसाठी बैठक घेण्यात आली. विविध विभागांच्या सूचना प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजीत करण्यात आली होती. कोरोनाचा काळ वगळता तीन वर्षानंतर जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी महोत्सव 2022-23 आयोजीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-प्रथमेश-वाडेकरचे-सीए-पर/
या महोत्सवाच्या संदर्भात तारीख, ठिकाण आणि उद्घाटन याबाबत पत्रव्यवहार सुरु असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दिवेकर यांनी दिली. सद्यस्थितीत रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांना जोडून 5 दिवसांचा महोत्सव आयोजीत करण्यात येणार असून यामध्ये कृषी प्रदर्शन, परिसंवाद,चर्चासत्रे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्र, विक्रेता संम्मेलन, शेतकरी सन्मान समारंभ याचा समावेश असणार आहे. यामध्ये एकूण दोनशे स्टॉल असणार आहेत.
या महोत्सवाची तारीख आणि ठिकाण अंतीम झाल्यानंतर याची माहिती सर्वांना कळविण्यात येणार आहे. बैठकीला सहायक संशोधन संचालक डॉ. ए.जी. माटीलकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यस्थापक श्रीपाद दामले, फलोत्पादन शेतकरी संदीप देसाई, शेतकरी प्रतिनिधी बाजीराव झेंडे अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी निलेश तेंडोलकर, शेतकरी महिला प्रतिनिधी रंजना कदम, विभागीय कृषी अधिकारी ए.जी. अडसुळे, पी.बी. ओहोळ, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, हर्षा गुंड, अश्विनी धारकर आदी उपस्थित होते.