अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे आता तौकते चक्री वादळात रुपांतर झाले आहे. चक्रीवादळ संभाव्य मार्गाने गुजरातच्या दिशेने जात असताना १५ ते १७ मे दरम्यान ते महाराष्ट्र किनारपट्टीला समांतर जाणार आहे. परिणामी किनारपट्टीच्या भागात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथील रत्नागिरीतील मिरकरवाडा भागातील बंदराला भेट देऊन समुद्रातून परतलेल्या बोटं बाबत माहिती घेतली व त्या बाबत योग्य त्या सूचना दिल्या.
जिल्ह्यातील सागर किनारी असलेल्या गावांत प्रशासनातर्फे या पद्धतीने चक्रीवादळ काळात सावधगिरी बाळगणे याबाबत सूचना दिल्या जात आहेत.नागरिकांनी घरातच रहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.दरम्यान कोकण किनारपट्टीवरही वादळी वाऱ्यांसह पावसाने सुरुवात केली आहे.वादळ कोकण किनारपट्टीला धडकणार म्हणून शासनाने मच्छिमारांना १४ ते १६ मे दरम्यान खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.
मात्र, शासनाच्या निर्देशाकडून दुर्लक्ष करून जिल्ह्यातील २१० बोटी मासेमारीसाठी समुद्रात गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्व बोटींना तात्काळ किनाऱ्यावर येण्याचे निर्देश मत्सव्यवसाय विभागाकडून देण्यात आले आहेत.समुद्रात गेलेल्या ३२५ मासेमारी बोटींपैकी २२९ बोटी परत आल्या आहेत.
केरळच्या किनारपट्टी भागात तौते चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. केरळमध्ये वाऱ्याचा वेग वाढला असून, किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. केरळमधील मालपूरम, कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड या पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.