मुंबई गोवा महामार्ग रखडविणाऱ्या  शासन -प्रशासन – ठेकेदार व नवीन डेडलाईनच्या निषेधार्थ तिरडी यात्रा

0
183
मुंबई गोवा महामार्ग रखडविणाऱ्या  शासन -प्रशासन - ठेकेदार व नवीन डेडलाईनच्या निषेधार्थ तिरडी यात्रा
मुंबई गोवा महामार्ग रखडविणाऱ्या  शासन -प्रशासन - ठेकेदार व नवीन डेडलाईनच्या निषेधार्थ तिरडी यात्रा

मुंबई गोवा महामार्ग रखडविणाऱ्या  शासन -प्रशासन – ठेकेदार व नवीन डेडलाईनच्या निषेधार्थ तिरडी यात्रा

मुंबई–गोवा महामार्गावर आता केवळ खड्डे, अपघात आणि तुटलेली आश्वासनेच नाहीत तर कोकणातील जनतेचा उसळलेला ज्वालामुखीही पेटला आहे. सतरा वर्षांचा रोष, ४,५०० मृतांचे मौन, हजारोंची जखमी देह आणि शासन– प्रशासन– ठेकेदारांच्या अमर्याद निष्काळजीपणाविरुद्ध आता कोकण उठून उभा राहत आहे. ही केवळ तिरडी यात्रा नाही… हा त्या मृतांच्या वेदनेचा जळता निषेध आहे, हा कोकणाच्या सहनशीलतेचा अंत आहे, हा शासनाच्या खोट्या डेडलाईन्सना दिलेला अंतिम इशारा आहे. ६ डिसेंबरपासून लोणेर्‍यातून निघणारी ही तिरडी यात्रा म्हणजे अपूर्ण कामांची, बुडालेल्या पैशांची, आणि राजकीय दांभिकतेची ‘अंत्यसंस्कार यात्रा’ आहे. आणि ११ जानेवारीला संगमेश्वरच्या रास्ता रोकोने ही ज्वाला एका मोठ्या लढ्यात परिवर्तित होणार आहे. आता कोकण शांत बसणार नाही आता शासनलाच उत्तर द्यावं लागणार आहे.

हे पण वाचा शिकार समजून झाडली गोळी : वेर्लेतील युवकाचा मृत्यू

मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासीयांच्या सहनशीलतेचा अंत होताना दिसतोय. सतरा वर्षांच्या असह्य प्रतिक्षेनंतर, दुर्घटनांत हजारो जीव गमावलेल्या आणि वारंवार फसवण्यात आलेल्या कोकणातील जनतेने अखेर कठोर पवित्रा घेत मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग जनआक्रोश समितीच्या नेतृत्वाखाली एक धडाकेबाज, लक्षवेधी आणि शासन–प्रशासन–ठेकेदारांना जागे करणारे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याच निषेधार्थ ६ डिसेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत महामार्गावर तिरडी यात्रा काढली जाणार असून हा आंदोलनात्मक कार्यक्रम लोणेर्‍यातून सुरू होऊन संगमेश्वर येथील रास्ता रोकोने समाप्त होणार आहे. कोकणाच्या रस्त्यांवरून जाणारी ही तिरडी यात्रा प्रत्यक्षात शासनाच्या निष्क्रियतेला, ठेकेदारांच्या बेफिकीरीला आणि प्रशासनाच्या उदासीनतेला दाखवणारी भिंग आहे.

सतरा वर्षे… होय, तब्बल सतरा वर्षे हा महामार्ग कोकणाच्या नागरिकांसाठी एक कायमस्वरूपी जखम ठरला आहे. केंद्र आणि राज्य शासनांकडून दरवर्षी नवीन डेडलाईन्स जाहीर होतात, उद्घाटने होतात, आश्वासने दिली जातात; परंतु कामाची गती मात्र अंगावर यावी इतकी मंद. महत्त्वाच्या ठिकाणी कामे अर्धवट ठेवली गेली आहेत, पूल–बोगदे अपूर्ण आहेत, रस्त्यांवर खोल खड्डे आणि एकेरी मार्ग अजूनही सुरू आहेत. परिणामी, प्रवाशांची सुरक्षितता देवाच्या भरोशावर आली असून, आजपर्यंत सुमारे ४,५०० नागरिकांनी अपघातांत प्राण गमावला आहे, तर हजारो जण गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णवाहिका अडकतात, पर्यटक अडकतात, आणि रोजंदारी करणारे स्थानिक तर यातून अक्षरशः त्रस्त झाले आहेत. मृत्यूंची ही सलग मालिका असूनही शासनाने अद्याप प्रभावी पावले उचलली नाहीत, हीच गोष्ट जनआक्रोशाचे मुख्य कारण ठरली आहे.

याच पार्श्वभूमीवर जनआक्रोश समितीने पुन्हा एकदा व्यापक आंदोलनाची घोषणा केली आहे. ६ ते ७ डिसेंबर रोजी लोणेरे ते कोलेटी येथे ‘तिरडी यात्रा’ सुरू होईल, जी शासनाच्या अपयशाचे प्रतीक म्हणून काढली जाणार आहे. त्यानंतर १३–१४ डिसेंबरला खेड ते चिपळूण, २७–२८ डिसेंबरला लांजा ते हातखंबा, ३–४ जानेवारीला हातखंबा ते संगमेश्वर आणि १०–११ जानेवारीला सावर्डे ते संगमेश्वर येथे आंदोलन पुढे सरकेल. अंतिम दिवशी संगमेश्वर येथे मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. कोकणातील सर्व नागरिकांनी, सर्व संघटनांनी आणि महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

समितीची मागणी सरळ आहे—“आम्हाला सुरक्षित आणि पूर्ण महामार्ग हवा.” त्यासाठी शासनाने बोलबच्चन न करता प्रत्यक्ष काम करावे, अशी जनतेची ठाम भूमिका आहे. समितीने शासनापुढे काही महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत. प्रथम, महामार्गाच्या कामाचे तटस्थ परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र उच्चस्तरीय समिती तातडीने नेमावी आणि त्यात जनआक्रोश समितीचे चार सदस्य सामावून घ्यावेत. दुसरे म्हणजे, अर्धवट काम, विलंब, निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचारास जबाबदार असलेल्या अधिकारी–ठेकेदारांवर कठोर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करावी. नागरिकांचे जीव गेले, हजारो जखमी झाले—यासाठी जबाबदार कोण, हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे.

महामार्गावरील सर्व अपूर्ण कामांसाठी एक स्पष्ट आणि अंतिम मुदत जाहीर करून त्याचे काटेकोर पालन केले पाहिजे. दर आठवड्याला प्रगतीचा अहवाल जाहीर करावा, अपूर्ण कामांच्या ठिकाणी स्पष्ट चेतावणी फलक लावावेत, तसेच महामार्गाची सद्यस्थिती आणि विलंबाची कारणे याबाबत सार्वजनिक अहवाल तातडीने प्रसिद्ध करावा. सर्व अपघातग्रस्तांना आर्थिक मदत आणि मृतांच्या कुटुंबियांना योग्य भरपाई देण्याची मागणीही समितीने केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य मिळाले पाहिजे, म्हणून महामार्गावर २४ तासांचे ट्रॉमा केअर सेंटर, अडथळा दूर करणारी यंत्रणा आणि आपत्कालीन सुविधा उभारण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. तसेच पर्यावरणाचा विनाश रोखण्यासाठी ज्याठिकाणी झाडे तोडली गेली, त्याच संख्येने स्थानिक जातींचे वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकणवासीयांना पर्यावरण आणि रस्ते—दोन्ही सुरक्षित हवे आहेत, हे या मागण्यांवरून स्पष्ट दिसते.

मुंबई–गोवा महामार्ग हा फक्त रस्ता नाही; तो कोकणाच्या अर्थव्यवस्थेची, पर्यटनाची, दैनंदिन जगण्याची आणि लाखो लोकांच्या सुरक्षिततेची जीवनवाहिनी आहे. परंतु शासनाच्या ढिसाळ धोरणांमुळे आणि ठेकेदारांच्या मनमानीमुळे ही जीवनवाहिनी आज मृतप्राय झाली आहे, म्हणूनच तिरडी यात्रा हा प्रतीकात्मक निषेधाचा अत्यंत प्रभावी मार्ग निवडण्यात आला आहे. आता शासनानेही हे गंभीरतेने घेत तातडीने कार्यवाही करावी, असा कोकणातील जनतेचा स्पष्ट संदेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here