अंबरनाथमध्ये बारवी धरणाची मुख्य जलवाहिनी फुटली; ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह MIDC क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर परिणामाची शक्यता
फॉरेस्ट नाका परिसरात रेल्वे पुलाजवळ घटना; दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अंबरनाथ :
अंबरनाथ शहरातील फॉरेस्ट नाका परिसरात रेल्वे पुलाजवळ बारवी धरणातून पाणी आणणारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (MIDC) मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, ठाणे महापालिका क्षेत्रासह विविध औद्योगिक वसाहतींमधील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बारवी धरणातून जांभूळ येथील MIDC जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत या मुख्य जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाते. त्यानंतर या केंद्रातून अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे तसेच आनंदनगर आणि तळोजा MIDC औद्योगिक क्षेत्रांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे मुख्य जलवाहिनी फुटल्याने या सर्व भागांतील पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि पाण्याची नासाडी टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामांदरम्यान संबंधित भागांतील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता.
त्यामुळे दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण होऊन संबंधित शहरांचा आणि औद्योगिक क्षेत्रांचा पाणीपुरवठा पूर्ववत होण्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.