ठाण्यातील वाहतूक कोंडीवर भाजप नगरसेविका उषा वाघ आक्रमक; अनधिकृत टपऱ्या व रिक्षा थांब्यांवर कारवाईची मागणी

0
9
ठाण्यातील वाहतूक कोंडीवर भाजप नगरसेविका उषा वाघ आक्रमक
ठाण्यातील वाहतूक कोंडीवर भाजप नगरसेविका उषा वाघ आक्रमक

ठाण्यातील वाहतूक कोंडीवर भाजप नगरसेविका उषा वाघ आक्रमक; अनधिकृत टपऱ्या व रिक्षा थांब्यांवर कारवाईची मागणी

खारटन रोड, चेंदणी कोळीवाडा आणि बाजारपेठ परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांना निवेदन

ठाणे :
ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक २२ मधील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर भाजपच्या स्थानिक नगरसेविका उषा विशाल वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परिसरातील अनधिकृत टपऱ्या, बेकायदेशीर वाहनतळ, बंद अवस्थेतील बेवारस वाहने तसेच अनधिकृत रिक्षा थांब्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी ठाणे महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडे केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी लक्षात घेता संबंधित विभागांनी समन्वयाने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
खारटन रोड परिसर, चेंदणी कोळीवाडा आणि बाजारपेठ हे भाग वाहतूक कोंडीचे प्रमुख केंद्र बनले असल्याचे नगरसेविका उषा वाघ यांनी निदर्शनास आणून दिले. या मार्गावरून टीएमटी, नवी मुंबई महानगरपालिकेची परिवहन सेवा तसेच भिवंडी, कशेळी आणि काल्हेरच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षा व टॅक्सींची दिवसभर मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते.
विशेषतः संध्याकाळच्या वेळेत वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनांच्या सततच्या हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषण, तर वाहनांच्या धुरामुळे वायुप्रदूषण वाढत असून स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः अस्थमा आणि श्वसनविकार असलेल्या नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
अनधिकृत रिक्षा थांब्यांमुळे वाहतुकीला अडथळा
भिवंडी, कशेळी आणि काल्हेर मार्गावरील रिक्षा व टॅक्सी चालक मनमानी पद्धतीने वाहने उभी करीत असल्याची तक्रार त्यांनी केली. चेंदणी कोळीवाडा परिसरात जेमतेम दोन रिक्षा उभ्या राहू शकतील अशा जागेत तिसरी रांग तयार केली जात असल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या प्रकारांवर वाहतूक पोलिसांचा पुरेसा वचक नसल्याची टीकाही त्यांनी केली.
पालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करावी
दिवाळीच्या सणादरम्यान बाजारपेठ आणि परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनधिकृत टपऱ्या, बेकायदेशीर पार्किंग, बेवारस वाहने आणि अनधिकृत रिक्षा थांबे यांच्यावर तातडीने कारवाई करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी उषा विशाल वाघ यांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदनाच्या प्रती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, आमदार संजय केळकर, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षा मीनल संख्ये तसेच वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here