मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील ५५७ रहिवाशांना ६ नोव्हेंबरला नव्या घरांच्या चाव्या
मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील ५५७ रहिवाशांना ६ नोव्हेंबरला नव्या घरांच्या चाव्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदनिकांचे हस्तांतरण
मुंबई :
एन.एम. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या पुनर्वसित इमारतींमधील ५५७ रहिवाशांना येत्या ६ नोव्हेंबर रोजी नव्या सदनिकांचा ताबा देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा पार पडणार असून, ते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येकी २२ मजल्यांच्या तीन पुनर्वसित इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या इमारतींमधील ५५७ सदनिकांच्या चाव्या संबंधित रहिवाशांना सुपूर्द करण्यात येणार आहेत. अनेक वर्षांपासून नव्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांसाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
हा पुनर्विकास प्रकल्प दोन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील तीन इमारती पूर्ण झाल्या असून, उर्वरित चार इमारतींमध्ये आणखी ६८४ सदनिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या कामाला पुढील टप्प्यातही गती मिळणार आहे.