अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा; गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला नसतानाही प्रवेश निश्चित होणार

0
55

मुंबई, प्रतिनिधी : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अद्याप मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला (LC) प्राप्त झालेला नसल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांकडून ही कागदपत्रे तात्काळ सादर करण्याची सक्ती न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण मंत्री Dadaji Bhuse यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यासंदर्भात शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना आवश्यक सूचना जारी केल्या आहेत.
सन २०२६-२७ च्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नियमित फेरी क्रमांक १ सुरू असून २९ मे २०२६ रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रक किंवा शाळा सोडल्याचा दाखला मिळालेला नाही, त्यांच्याकडून ही कागदपत्रे उपलब्ध होताच सादर करण्यात येतील, असे हमीपत्र घेऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.
दरम्यान, आधार व्हेरिफाइड विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका डिजीलॉकरवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, निर्धारित कालावधीत गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो, याची जाणीव विद्यार्थी आणि पालकांना करून देण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
या निर्णयामुळे आवश्यक कागदपत्रांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेत मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here