अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी नीलम शिर्के सामंत रिंगणात
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी नीलम शिर्के सामंत रिंगणात
चित्रपटसृष्टीत राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चांना उधाण
मुंबई | प्रतिनिधी
गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे. यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, चित्रपट क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.
महामंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विविध स्तरांवर हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगत असतानाच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के सामंत यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी क्षेत्राशी संबंधित कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या महामंडळाच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याचे बोलले जात आहे.
महामंडळाच्या निवडणुकीत विविध गट सक्रिय झाले असून, आगामी काळात निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या भविष्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक यंदा विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.