वरळी जेट्टी विकासाला गती; सागरी वाहतूक, पर्यटन आणि आपत्कालीन सेवांना मिळणार चालना
वरळी जेट्टी विकासाला गती; सागरी वाहतूक, पर्यटन आणि आपत्कालीन सेवांना मिळणार चालना
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील सागरी वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने वरळी जेट्टीच्या नियोजित विकासाला गती दिली आहे. यासंदर्भात मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या होर्डिंग व जाहिरात धोरणाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे मुंबईतील जलवाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असून, प्रवाशांसाठी अधिक जलद आणि पर्यावरणपूरक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत. वरळी जेट्टीचा विकास हा केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून, आपत्कालीन सेवा, पर्यटन आणि किनारी भागांतील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे मुंबईतील सागरी पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीही मदत होणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
या बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.