उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी रायगड जिल्हा परिषदेत ५० लाखांचे ई-टेंडर? चौकशीची मागणी

0
10
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी रायगड जिल्हा परिषदेत ५० लाखांचे ई-टेंडर? चौकशीची मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी रायगड जिल्हा परिषदेत ५० लाखांचे ई-टेंडर? चौकशीची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी रायगड जिल्हा परिषदेत ५० लाखांचे ई-टेंडर? चौकशीची मागणी

अलिबाग | प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात शासकीय दुखवटा सुरू असताना रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून ५० लाख रुपयांचे ई-टेंडर प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी २०२६ रोजी ‘किचन सेट’ साहित्य खरेदीसाठी सुमारे ५० लाख रुपयांचे ई-टेंडर प्रसिद्ध करण्यात आले. संबंधित दिवशी राज्यात शासकीय दुखवटा असल्याने शासकीय कार्यालयांना सुट्टी होती. अशा परिस्थितीत टेंडर प्रक्रिया कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या कारणासाठी राबविण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सावंत यांनी केलेल्या आरोपांनुसार, यापूर्वी ५ जानेवारी २०२६ रोजी काढण्यात आलेले टेंडर रद्द करण्यात आले होते. त्यानंतर १३ जानेवारी रोजी दुसरे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले, तेही रद्द झाले. अखेरीस २८ जानेवारी रोजी तिसरे टेंडर प्रसिद्ध करण्यात आल्याने या प्रक्रियेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
तसेच महिला व बालकल्याण विभागाने यापूर्वीच सुमारे ५ कोटी रुपयांचे किचन सेट साहित्य खरेदी केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा ५० लाख रुपयांचे नवीन टेंडर काढण्यामागील कारण स्पष्ट करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
खरेदी केलेल्या साहित्याच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणात अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात संगनमत झाल्याचा आरोपही करण्यात आला असून, संपूर्ण टेंडर प्रक्रिया, आर्थिक व्यवहार आणि खरेदी प्रक्रियेची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित विभाग किंवा प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here