अजित पवारांच्या निधनामुळे एकनाथ शिंदेंकडून वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा ९ फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट आवाहन करत सांगितले की, त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही कार्यक्रम, समारंभ किंवा सत्कार आयोजित करू नये. शोकाकुल वातावरणात कोणताही उत्सव साजरा करणे योग्य ठरणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या दुःखात सहभागी होत, संवेदनशीलता आणि संयम पाळावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्ते व समर्थकांना केले आहे.
यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सामाजिक बांधिलकी जपत संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. शोक व्यक्त करण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणे, असा संदेश देत त्यांनी या काळात कोणताही जल्लोष टाळून दिवंगत नेत्याला आदरांजली वाहण्याचे आवाहन केले आहे.
तसेच या काळात सर्वांनी साधेपणा पाळून शांततेत राहावे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.


