अजित पवार–बजरंग सोनवणे एकाच हेलिकॉप्टरमध्ये !
बीडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा
बीड l
विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी बीड जिल्ह्यात दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार परतीच्या प्रवासात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. बीड ते संभाजीनगर आणि संभाजीनगर ते पुणे या हेलिकॉप्टर प्रवासासाठी त्यांनी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांना सोबत घेतल्याने जिल्ह्यात दिवसभर राजकीय चर्चांना उधाण आले.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल झाले होते. सुमारे चार तासांच्या दौऱ्यात त्यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर खा. बजरंग सोनवणे, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. सुरेश धस आणि आ. विजयसिंह पंडित उपस्थित होते.
कार्यक्रम आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार संभाजीनगर कडे रवाना होताना त्यांनी खा. बजरंग सोनवणे यांना आपल्या हेलिकॉप्टरमध्ये सोबत घेतले. दोघांचा एकत्र प्रवास पाहून बीडच्या राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. हा प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या संभाव्य जवळिकीचा संकेत आहे की जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना दिलेला रणनीतिक इशारा, याबाबत चर्चा सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आमदार धनंजय मुंडे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा बीड जिल्ह्यात रंगू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे जर एकाच पक्षात एकत्र येत असतील, तर आम्हीही बजरंग सोनवणे यांच्यासोबत राजकीय समीकरण जुळवू शकतो, असा अप्रत्यक्ष संदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचा तर्क काही राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.
या हेलिकॉप्टर प्रवासातून दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत आहेत की मुंडे बंधू-भगिनींना दिलेला राजकीय इशारा, हे आगामी काळात स्पष्ट होणार असून, बीडच्या राजकारणात नव्या घडामोडींची चाहूल लागल्याचे स्पष्ट होत आहे.


