अनधिकृत गॅस कनेक्शन तसेच रेशन कार्ड वाटपाबाबत दाखल झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून त्याचा तात्काळ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या अर्ज व प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला.
नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची वेळेत पडताळणी करून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा सूचना त्यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या. तसेच सांडपाणी व्यवस्थापनाबाबत बिल्डरविरोधात दाखल झालेल्या तक्रारीवर एमएसआरडीसीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा आढावा
लोकशाही दिनाच्या बैठकीदरम्यान सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचाही आढावा घेण्यात आला. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन ही महत्त्वाची संधी असल्याचे जिल्हाधिकारी जिंदल यांनी सांगितले.
सर्व विभागांनी आपापले निर्धारित उद्दिष्ट पुढील आठवडाभरात पूर्ण करून निधी जमा करावा आणि या उपक्रमात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या लोकशाही दिनाला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एम. एस. कुलकर्णी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव व सागर पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद्र बिरादार, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.