अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्या ‘जीवनदूतां’चा रायगड पोलिसांकडून गौरव
अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्या ‘जीवनदूतां’चा रायगड पोलिसांकडून गौरव
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत संवेदनशील नागरिक व सामाजिक संस्थांचा ‘जीवनदूत पुरस्कार’ देऊन सन्मान
रायगड :
अपघाताच्या निर्णायक क्षणी तातडीने मदतीचा हात पुढे करून एखाद्याचा जीव वाचविणाऱ्या संवेदनशील नागरिक आणि सामाजिक संस्थांचा रायगड पोलिसांच्या वतीने ‘जीवनदूत पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत संवेदनशील नागरिक व सामाजिक संस्थांचा ‘जीवनदूत पुरस्कार’ देऊन सन्मान
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आरसीएफ सभागृह, कुरुळ येथे आयोजित कार्यक्रमात अपघातग्रस्तांना कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करणाऱ्या आणि त्यांचे प्राण वाचविण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करणाऱ्या नागरिक व सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला.
हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत मारुती गोगावले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
काही मिनिटांची मदत, आयुष्याची नवी सुरुवात
अपघातानंतरची काही मिनिटे अत्यंत निर्णायक असतात. या काळात मिळालेली तातडीची मदत अनेकदा जखमी व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी महत्त्वाची ठरते. त्यासोबतच एका संपूर्ण कुटुंबाचा आधारही वाचविण्याचे काम या मदतीतून होते.
अपघातग्रस्त व्यक्तीला वेळेवर मिळणारी मदत ही केवळ उपचाराची सुरुवात नसून, त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला पुन्हा नव्याने उभे राहण्याची संधी देणारी ठरते. त्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता मदतीसाठी पुढे येणारे नागरिक आणि संस्था हेच खरे ‘जीवनदूत’ असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
रस्ते अपघातांमध्ये जखमींना तातडीने मदत करण्याची ही माणुसकीची साखळी अधिक मजबूत करण्याचे आवाहनही करण्यात आले.
“काही मिनिटांची मदत, एका आयुष्याची नवी सुरुवात!” या संदेशातून रस्ता सुरक्षा आणि मानवी संवेदनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.