गणेशोत्सवानिमित्त १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान मोफत समुदाय आरोग्य शिबिरे; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश
रत्नागिरी :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी राज्यभरात ‘श्रीगणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध ठिकाणी मोफत समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई अंतर्गत ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष’ आणि ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष’ यांच्या समन्वयाने ही मोहीम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
आरोग्य तपासण्यांसह मोफत औषधोपचार
या समुदाय आरोग्य शिबिरांमध्ये नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये आवश्यक रक्त चाचण्या, ईसीजी (ECG), विविध निदानात्मक व अनुषंगिक तपासण्या तसेच आवश्यकतेनुसार उपचार आणि मोफत औषधोपचार यांचा समावेश असेल.
विविध विभागांचा सहभाग
शिबिरे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय आयुक्त, नगरपालिका प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच STEMI समन्वयक यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये तसेच रुग्णालयांच्या सहकार्याने ही आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
वैद्यकीय सुविधा व औषधांचा पुरेसा साठा
शिबिरांसाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल कर्मचारी, निदानात्मक साधने आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत नियमित तपासणी करून घ्यावी आणि या अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या मोफत समुदाय आरोग्य शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.