अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नवी मुंबई महापालिकेचे सलग तीन दिवस भाषा संवर्धनाचे उपक्रम
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नवी मुंबई महापालिकेचे सलग तीन दिवस भाषा संवर्धनाचे उपक्रम
नवी मुंबई :
अभिजात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून राज्यभरात ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विविध भाषा संवर्धनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषेचा गौरव वाढविणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून, सलग तीन दिवस विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकसहभागातून अभिजात मराठी भाषेची वैशिष्ट्ये, समृद्ध साहित्यपरंपरा आणि भाषेचे वैभव नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर या उपक्रमांचा भर आहे.
बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात सुप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते संजय उपाध्ये यांचा ‘मातृभाषा आणि मनःशांती’ या विषयावर सुसंवाद आयोजित करण्यात आला आहे. ‘गप्पाष्टक’ आणि ‘मन करा रे प्रसन्न’ यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमधून संजय उपाध्ये रसिकांच्या परिचयाचे आहेत.
गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता नामवंत लेखक व व्याख्याते विवेक मेहेत्रे यांचे ‘कार्यालयीन कामकाजात ए.आय.चा प्रभावी वापर’ या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान होणार आहे.
शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता ‘अभिजात मराठी काव्य सादरीकरण स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना स्वतःची कविता सादर न करता अभिजात मराठी भाषेतील नामवंत कवींच्या आवडत्या एका कवितेचे जास्तीत जास्त पाच मिनिटांत सादरीकरण करायचे आहे. या माध्यमातून मराठी कवितेची समृद्ध परंपरा, भाषेचे वैभव आणि शब्दलालित्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता होणार असून विजेत्यांना ग्रंथभेट स्वरूपात आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.
या काव्य सादरीकरण स्पर्धेत नवी मुंबईतील नागरिक तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी सहभागी होऊ शकतात. प्रवेश विनामूल्य आहे.
याशिवाय ‘मराठी घोषवाक्य / संदेश स्पर्धा’ देखील जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबईकर नागरिक तसेच महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. मराठी भाषा संवर्धन, स्वच्छता, पर्यावरण, प्लास्टिक प्रतिबंध आणि आरोग्य या पाच विषयांवर प्रत्येक विषयासाठी एक घोषवाक्य किंवा जनजागृतीपर काव्यात्म संदेश (चारोळी) पाठविता येणार आहे.
दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी 9930020814 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून ७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
सर्व कार्यक्रम सीबीडी बेलापूर, सेक्टर १५ ए येथील नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील ज्ञानकेंद्रात होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. अभिजात मराठी भाषाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे उपक्रम यशस्वी करावेत आणि मराठी भाषा जागरात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.