अलिबाग नगर परिषद निवडणूक २०२५
जिल्हाधिकारी किशन जावळेंची स्ट्राँगरुमला भेट
रायगड–अलिबाग, दि. १८ (जिमाका) : अलिबाग नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मतपेट्या ठेवण्यात आलेल्या जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय, अलिबाग येथील स्ट्राँगरुमला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान स्ट्राँगरुममध्ये बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस बंदोबस्त, सुरक्षा उपकरणे तसेच अन्य आवश्यक व्यवस्थांची पाहणी करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व सुरक्षितता कायम राखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित असल्याची खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी करून घेतली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अलिबाग विक्रम पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सागर साळुखे तसेच अजित टोळकर उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


