सातार्‍यातील निर्जन भागात ४५ किलो ड्रग्ज सापडल्याने खळबळ

0
108
सातार्‍यातील निर्जन भागात ४५ किलो ड्रग्ज सापडल्याने खळबळ
सातार्‍यातील निर्जन भागात ४५ किलो ड्रग्ज सापडल्याने खळबळ

सातार्‍यातील निर्जन भागात ४५ किलो ड्रग्ज सापडल्याने खळबळ

शेड, रिसॉर्ट, कोट्यवधींचा रस्ता आणि सत्तेशी जोडलेले धागे चर्चेत
सातारा l
सातारा जिल्ह्यातील एका निर्जन भागात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तब्बल ४५ किलो अमली पदार्थ सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अंदाजे ११५ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या ड्रग्ज प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, सत्तेशी संबंधित काही नावे चर्चेत आली आहेत. मात्र, इतका मोठा साठा सापडूनही या प्रकरणाची माहिती मर्यादित स्वरूपातच समोर येत असल्याने संशय अधिक गडद होत आहे.
ज्या पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज सापडले, त्या शेडची सातबारा नोंद गोविंद शिनकर यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. गोविंद शिनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शेडची चावी ओमकार डिगे ऊर्फ ‘कालू’ याच्याकडे होती. विशेष बाब म्हणजे, ओमकार डिगेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काही वेळातच सोडून देण्यात आले. त्याला का सोडण्यात आले, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
या शेडकडे जाण्यासाठी सुमारे १२०० मीटर लांबीचा सिमेंट काँक्रीट रस्ता बांधण्यात आला असून, त्याचा खर्च अंदाजे ७५ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. हा परिसर पूर्णतः निर्जन आहे. तेथे ना गाव आहे, ना घरे, ना लोकवस्ती, ना दैनंदिन वर्दळ. अशा ठिकाणी एवढ्या मोठ्या खर्चाचा रस्ता नेमका कशासाठी बांधण्यात आला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा रस्ता थेट शेड आणि जवळ उभारल्या जात असलेल्या एका रिसॉर्टकडे जातो.
या ठिकाणी उभारण्यात येत असलेले रिसॉर्ट ‘हॉटेल तेज-यश’ या नावाने ओळखले जाते. या रिसॉर्टचे मालक प्रकाश संभाजी शिंदे असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे बंधू असल्याचे सांगितले जाते. या रिसॉर्टमध्ये सध्या ७ ते ८ खोल्या तयार असून, आतील भागात विविध सुविधा उभारण्याचे काम सुरू होते.
या रिसॉर्टचे व्यवस्थापन रंजीत शिंदे यांच्याकडे असल्याची माहिती आहे. रंजीत शिंदे हे दरे गावचे सरपंच असून, ते युवासेना (शिंदे गट) चे तालुका प्रमुख असल्याचेही सांगितले जाते. विशेष म्हणजे, ज्या शेडमध्ये ड्रग्ज सापडले, त्या शेडमध्ये राहत असलेल्या तीन व्यक्तींना याच रिसॉर्टमधून जेवण पुरवले जात होते, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
पोलिस नोंदींनुसार, शेडमध्ये राहणाऱ्या तीन व्यक्तींची नावे कायम नजर अब्बास सय्यद, हबीजुल फक्रूल इस्लाम (रहिवासी – मोरीगाव, आसाम) आणि राजिकूल खलीलूल रहमान अशी आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हे तिघे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून त्या शेडमध्ये राहत होते. ते बाहेर फारसे दिसत नसत आणि त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण कारवाईत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ही कारवाई सातारा पोलिसांनी नव्हे तर मुंबईतील घाटकोपर क्राइम ब्रँचने केल्याचे समोर आले आहे. यामुळे स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवण्यात आले होते का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. या कारवाईचे नेतृत्व पीआय आत्माजी सावंत यांनी केले होते. मात्र, कारवाईनंतर अधिक तपशीलवार माहिती देणारी स्वतंत्र प्रेस नोट किंवा पत्रकार परिषद झालेली नाही.
एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले असले, तरी या प्रकरणातील FIR अद्याप सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. कायद्यानुसार FIR हा सार्वजनिक दस्तऐवज असतो, तरीही चार दिवस उलटूनही त्याची प्रत मिळत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, MSRDC च्या विशेष प्राधिकरणाने या रिसॉर्टच्या बांधकामावर आक्षेप नोंदवले असल्याची कागदपत्रे समोर आली आहेत. नियमानुसार धार्मिक स्थळापासून किमान ७५ मीटर अंतरावरच बांधकाम करण्याची परवानगी असताना, प्रत्यक्षात हे बांधकाम केवळ ५ मीटर अंतरावर करण्यात आल्याचा आरोप आहे. तरीही या उल्लंघनावर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही.
४५ किलो ड्रग्जसारखा गंभीर गुन्हा, त्यामागील आर्थिक उलाढाल, सत्तेशी जोडलेले संबंध, नियमबाह्य बांधकाम आणि FIR संदर्भातील मौन—या सगळ्या बाबी एकत्र पाहता हे प्रकरण केवळ एक साधी कारवाई नसून, मोठ्या रॅकेटचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या प्रकरणातील अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असून, सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here