तिकीट द्या, नाहीतर जीवाचे बरे-वाईट करून घेईन भाजप कार्यकर्त्याची थेट धमकी

0
105
तिकीट द्या, नाहीतर जीवाचे बरे-वाईट करून घेईन भाजप कार्यकर्त्याची थेट धमकी
तिकीट द्या, नाहीतर जीवाचे बरे-वाईट करून घेईन भाजप कार्यकर्त्याची थेट धमकी
तिकीट द्या, नाहीतर जीवाचे बरे-वाईट करून घेईन भाजप कार्यकर्त्याची थेट धमकी

व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोलापुरात खळबळ

सोलापूर l
महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना सोलापूर शहरात भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी एका इच्छुक कार्यकर्त्याने थेट आत्महत्येचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “मला उमेदवारी मिळाली नाही, तर माझ्या जीवाचे बरे-वाईट करून घेईन आणि त्याला पक्ष जबाबदार असेल,” असा थेट इशारा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत धुम्मा यांनी दिला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण १०२ जागांसाठी आगामी काळात निवडणूक होणार असून, या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, तब्बल १,२०० हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे तिकीट वाटपाच्या प्रक्रियेतून असंतोष उफाळून येण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती. त्यातच आता अनंत धुम्मा यांच्या विधानामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
अनंत धुम्मा हे गेल्या ४० वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते असून, पक्षाच्या स्थापनेपासून आपण सातत्याने काम करत असल्याचा त्यांचा दावा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धुम्मा म्हणतात की, “मी गेली चार दशके भाजपचे काम करत आहे. पक्षावर विश्वास ठेवून मी आजपर्यंत कोणतीही अपेक्षा न ठेवता काम केले. यावेळी मला उमेदवारी मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. मात्र माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय झाला आणि माझ्या जीवाचे बरे-वाईट काही झाले, तर त्याला मी जबाबदार राहणार नाही.
पुढे बोलताना त्यांनी असा दावा केला आहे की, “मी नगरसेवक नसतानाही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना घराघरात पोहोचवण्याचे काम केले आहे. कार्यकर्ता म्हणून मी प्रामाणिकपणे काम केले. इतके करूनही जर न्याय मिळत नसेल, तर स्वतःला काहीतरी करून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही.” तसेच पक्षाने निष्ठावंत व काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या व्हिडिओमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, भाजपमधील तिकीट वाटपावरून नाराजी किती टोकाला गेली आहे, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनंत धुम्मा यांनी स्पष्टीकरण देत आपण हे विधान भावनेच्या भरात केल्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here