अल्पवयीन वाहनचालकांचा वाढता धोका

0
11
अल्पवयीन वाहनचालकांचा वाढता धोका
अल्पवयीन वाहनचालकांचा वाढता धोका

अल्पवयीन वाहनचालकांचा वाढता धोका

पालक, शिक्षक आणि प्रशासनाने जागरूक होण्याची गरज

सिंधुदुर्ग /अभिमन्यू वेंगुर्लेकर
शहर असो वा ग्रामीण भाग, आजकाल रस्त्यावर अल्पवयीन मुले सर्रासपणे दुचाकी व चारचाकी वाहने चालवताना दिसत आहेत. मित्रांसोबत रील बनवण्यासाठी किंवा केवळ थ्रिल म्हणून ही मुले स्वतःचा तसेच इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असून रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने मोठे आव्हान ठरत आहे.
अलीकडच्या काळात अल्पवयीन मुलांच्या वाहनचालकांमुळे झालेल्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशा अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत, तर काही वेळा संपूर्ण कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. क्षणिक हौस किंवा निष्काळजीपणा दीर्घकालीन दुःखाला कारणीभूत ठरू शकतो.
पालकांनी जागरूक राहणे अत्यावश्यक
मुलांच्या हट्टापुढे झुकून किंवा त्यांच्या कौतुकासाठी वाहनाची चावी देणे हे गंभीर परिणामांना निमंत्रण ठरू शकते. मोटार वाहन कायद्यानुसार 18 वर्षांखालील व्यक्तींना वाहन चालवण्यास सक्त मनाई आहे. तरीही पालकांकडून होणारे दुर्लक्ष या समस्येला खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पालकांनी स्वतः कायद्याचे पालन करणे आणि मुलांमध्ये शिस्त निर्माण करणे आवश्यक आहे.
शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
शाळा व महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम आणि अपघातांचे दुष्परिणाम याबाबत नियमित जनजागृती करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातील जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. पालक-शिक्षक सभांमध्ये या विषयावर विशेष चर्चा होणे काळाची गरज आहे.
प्रशासनाकडून कठोर कारवाईची गरज
वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी अल्पवयीन वाहनचालक आणि त्यांना वाहन देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. कायद्यानुसार अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवत असल्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंड, पालकांना ३ वर्षांपर्यंत कारावास आणि संबंधित वाहनाची नोंदणी एक वर्षासाठी रद्द होण्याची तरतूद आहे. केवळ दंडात्मक कारवाई न करता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे.
एका क्षणाचा निष्काळजी निर्णय आयुष्यभराचे दुःख देऊ शकतो. त्यामुळे पालक, शिक्षक आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे या समस्येकडे गांभीर्याने पाहून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
‘मुलांचे प्राण अनमोल आहेत, त्यांचे संरक्षण करा’ हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here