अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचार सभा
प्रतिनिधी
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा उत्साहात पार पडली. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर आढावा घेतला. मागील काळात राबविण्यात आलेल्या विकासकामांचा उल्लेख करत, आगामी काळात शहरासाठी अधिक गतिमान आणि नियोजित विकासाची दिशा स्पष्ट केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत अहिल्यानगरला आधुनिक शहर म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. महानगरपालिका निवडणूक ही केवळ प्रतिनिधी निवडण्यापुरती मर्यादित नसून शहराच्या भविष्यासाठी योग्य दिशा ठरविण्याची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रचार सभेला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रम पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनीही मतदारांना मार्गदर्शन करत विकासाच्या मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
सभेला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती. नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यांवर दिलेल्या आश्वासनांचे स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला. या जाहीर सभेमुळे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे चित्र दिसून आले.


