आदेशाचे पालन न केल्याने आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग निलंबित

0
35
आदेशाचे पालन न केल्याने आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग निलंबित
आदेशाचे पालन न केल्याने आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग निलंबित

आदेशाचे पालन न केल्याने आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग निलंबित

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) सदस्य सचिव आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग (२०११ बॅच) यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी ब्रीफिंगसाठी बोलावूनही ते उपस्थित राहिले नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.

विधानसभेतील चर्चेदरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी या प्रकरणाची दखल घेत निलंबनाचे आदेश दिले. सामान्य प्रशासन विभागाकडून अतिरिक्त सचिव व्ही. राधा यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. अखिल भारतीय सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६९ मधील नियम ३(१)(अ) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आदेशानुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित असल्याने एम. देवेंद्र सिंग यांचे तत्काळ प्रभावाने निलंबन करण्यात आले आहे. याच प्रकरणात सहसंचालक आयएएस सतीश पडवळ यांच्याविरोधातही निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एम. देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर ही कारवाई अधिकृतरीत्या अमलात आली.

निलंबन काळात त्यांचे मुख्यालय मुंबई राहणार असून कोकण विभागीय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच या काळात कोणतीही खासगी नोकरी, व्यापार किंवा व्यवसायात सहभागी होता येणार नाही. निलंबन काळात त्यांना निर्वाह भत्ता व महागाई भत्ता मिळणार असला तरी त्यासाठी अन्य कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

एम. देवेंद्र सिंग हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव असून राज्यातील प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित विविध महत्त्वाच्या कामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांच्या निलंबनामुळे प्रशासनात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here