आधुनिक कोळंबी प्रक्रिया व निर्यात तंत्रज्ञानाचा पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून अभ्यास
आधुनिक कोळंबी प्रक्रिया व निर्यात तंत्रज्ञानाचा पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून अभ्यास
आंध्र प्रदेशातील जगदीश मरीन एक्सपोर्ट्स आणि मौर्य ॲक्वेक्सला भेट; महाराष्ट्रातील समुद्री खाद्यप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यावर भर
सिंधुदुर्ग, प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय आणि समुद्री खाद्यप्रक्रिया उद्योग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या मत्स्यव्यवसाय अभ्यास दौऱ्यादरम्यान सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेशातील रायालम, भीमावरम येथील जगदीश मरीन एक्सपोर्ट्स आणि मौर्य ॲक्वेक्स या उद्योगांना भेट दिली. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावरील कोळंबी प्रक्रिया, निर्यातक्षम उत्पादनांची निर्मिती आणि समुद्री खाद्यपदार्थांचे मूल्यवर्धन यांची माहिती घेतली.
या भेटीदरम्यान कच्च्या मालाची हाताळणी, कोळंबीची प्रतवारी, सोलणे व स्वच्छ करणे, वैयक्तिक जलद गोठवण (IQF) आणि ब्लॉक फ्रीझिंग यांसारख्या प्रक्रियांचा अभ्यास करण्यात आला. तसेच शिजवलेली व ब्लँच केलेली उत्पादने तयार करण्याची पद्धत, शीतसाखळी व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण, अन्नसुरक्षा आणि निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या मानकांची पूर्तता याबाबतही माहिती घेण्यात आली.
समुद्री खाद्यप्रक्रिया उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनांचे विविधीकरण, उत्पादनांचा संपूर्ण मागोवा घेण्याची यंत्रणा आणि काढणीनंतरचे योग्य व्यवस्थापन यांना विशेष महत्त्व आहे. या उद्योगांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केल्यामुळे प्रक्रिया सुविधांचे आधुनिकीकरण आणि निर्यातक्षम उत्पादनांची निर्मिती याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
या अभ्यास दौऱ्यातून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग महाराष्ट्रातील समुद्री खाद्यप्रक्रिया उद्योग अधिक सक्षम करण्यासाठी होऊ शकतो. मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला चालना देणे, प्रक्रिया उद्योगातील गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढविणे तसेच जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राची स्पर्धात्मकता मजबूत करणे, या दृष्टीने हा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.