वेंगुर्ला-दाभोलीत लोकसहभागातून तीन भव्य वनराई बंधाऱ्यांची उभारणी

0
11
वेंगुर्ला-दाभोलीत लोकसहभागातून तीन भव्य वनराई बंधाऱ्यांची उभारणी
वेंगुर्ला-दाभोलीत लोकसहभागातून तीन भव्य वनराई बंधाऱ्यांची उभारणी

वेंगुर्ला-दाभोलीत लोकसहभागातून तीन भव्य वनराई बंधाऱ्यांची उभारणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ ते दहा दिवसांत चार हजारांहून अधिक बंधारे; जलसंधारणासाठी ग्रामस्थांचे श्रमदान, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून कौतुक

वेंगुर्ला, प्रतिनिधी :
भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून तीन भव्य वनराई बंधाऱ्यांची उभारणी केली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात सुमारे २५० ग्रामस्थांनी श्रमदान करून जलसंधारणाच्या कार्यात सहभाग नोंदविला.

दाभोली येथे उभारण्यात आलेल्या एका बंधाऱ्यासाठी सुमारे एक हजार पोत्यांचा वापर करण्यात आला असून, या बंधाऱ्याची लांबी सुमारे ७५ फूट आहे. ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या या कामातून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे परिसरातील जलस्रोतांचे संवर्धन होण्यास आणि भूजलपातळी वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ग्रामस्थ, महिला बचत गट, शालेय विद्यार्थी, लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. दुष्काळसदृश परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिक स्वतःहून श्रमदानासाठी पुढे येत आहेत, ही अत्यंत आशादायी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता नागरिकांनी स्वतःच्या श्रमातून जलसंधारणाची कामे हाती घेणे ही लोकसहभागाची सकारात्मक दिशा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांत लोकसहभागातून चार हजारांहून अधिक वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. प्रशासन आणि जनता यांच्यातील समन्वयातून उभी राहिलेली ही चळवळ जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दाभोली येथील बंधाऱ्यांमुळे परिसरातील सुमारे चार ते पाच किलोमीटर क्षेत्रातील पाणी टिकून राहण्यास मदत होईल, तसेच आजूबाजूच्या विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमावेळी गाव सुजलाम् सुफलाम् होण्यासाठी ग्रामदैवताला गाऱ्हाणे घालण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गावातील जलतारा कामाचे उद्घाटनही करण्यात आले. वनराई बंधारे उभारणे, जलतारा आणि नदी-नाल्यांमधील गाळ काढणे अशा विविध उपाययोजनांद्वारे जिल्ह्यातील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू आहे.
गावाच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन वनराई बंधारा उभारलेल्या ठिकाणी कायमस्वरूपी पक्का बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामपंचायत, पंचायत समिती, कृषी विभाग आणि अन्य शासकीय यंत्रणांनी स्थानिक गरजांनुसार नियोजन करून लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांना अधिक बळ द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार ओंकार ओतारी, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, पंचायत समिती सदस्य शंकर घोट, शीतल राऊत, उपसभापती सचिन देसाई, मंगेश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here