आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायतीचे उपक्रम कौतुकास्पद – मनिष दळवी

0
100
आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायतीचे उपक्रम कौतुकास्पद - मनिष दळवी
आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायतीचे उपक्रम कौतुकास्पद - मनिष दळवी

आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायतीचे उपक्रम कौतुकास्पद – मनिष दळवी

दोडामार्ग / सुमित दळवी
ग्रामविकासाची खरी संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारी आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायत आज विकासाचा आदर्श ठरत असून, आपल्या नियोजनबद्ध व दर्जेदार कामकाजाच्या जोरावर तिने जिल्ह्यासह राज्यपातळीवर नावलौकिक मिळवला आहे. नूतन ग्रामपंचायत प्रशासकीय इमारत आणि दोडामार्ग तालुक्यातील पहिले ‘महिला भवन’ उभारून ग्रामपंचायतीने सामाजिक विकासाचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारत व महिला भवनाचा लोकार्पण सोहळा मनीष दळवी यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ग्रामपंचायतीने केलेली विकासकामे ही इतर गावांसाठी दिशादर्शक ठरत असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला भवनाचा मोठा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात मनीष दळवी यांनी दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांकडेही लक्ष वेधले. तालुक्यात वन्य प्राण्यांचा, विशेषतः हत्तींचा उपद्रव वाढत असून, हेवाळे परिसरात सात हत्तींचा कळप शेती व बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हत्ती पकडण्याची मोहीम प्रस्तावित करण्यात आली होती; मात्र प्राणीमित्रांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे ही मोहीम रखडली. आयुष्यभराच्या कष्टाने उभी राहिलेली बागायती उद्ध्वस्त होत असताना शेतकऱ्यांचे दुःख समजून घेणारे कोणी नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा भाजप सरचिटणीस महेश सारंग यांनी दोडामार्ग तालुक्याने नेहमीच महायुतीला भक्कम साथ दिल्याचे सांगत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही हीच एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी महिला भवन उभारण्यामागील संकल्पनेचे विशेष कौतुक करत ग्रामपंचायतीच्या कार्याचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच सौ. साक्षी देसाई यांनी प्रास्ताविक करत ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हा विकास शक्य झाल्याचे सांगितले. यावेळी माजी सरपंच, तिन्ही गावांतील पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामरोजगार सेवक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या लोकार्पण सोहळ्याला नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, शिवसेना तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, उपसरपंच सौ. वैशाली गवस, माजी सरपंच संदीप देसाई, समीर देसाई, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, रामदास मेस्त्री, भगवान गवस, शेटकर, गोपाळ गवस यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत गवस यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here