आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणीस मुदतवाढ

0
31
मुंबईतील कोणत्याही शाळेचे खासगीकरण नाही!
मुंबईतील कोणत्याही शाळेचे खासगीकरण नाही!

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणीस मुदतवाढ

ठाणे : शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतील शाळा नोंदणी व शाळा पडताळणीस शासनाने मुदतवाढ दिली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात दि. ९ जानेवारी ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत शाळा नोंदणी व पडताळणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत शंभर टक्के नोंदणी व पडताळणी पूर्ण न झाल्याने, शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांच्या दि. १९ जानेवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार, दि. २० जानेवारी ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत संबंधित सर्व विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी आपली ऑनलाईन नोंदणी व शाळा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीनंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शाळा पडताळणीदरम्यान बंद शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरित झालेल्या शाळांचा आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शाळेला ज्या शिक्षण मंडळाची मान्यता आहे, तेच मंडळ नोंदणीवेळी निवडले आहे का, याची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

या संदर्भातील सूचना सर्व महापालिकांचे शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी तसेच पंचायत समितींचे गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रिया पारदर्शक, अचूक व वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेमुळे समाजातील दुर्बल व वंचित घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध होत असून, शाळा प्रशासनाने दिलेल्या अंतिम मुदतीत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद ठाणे बाळासाहेब राक्षे यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here