आरोग्य शिबिर, वृक्षारोपणाने रत्नागिरीत ‘सेवा संकल्प अभियान’चा जागर

0
14
आरोग्य शिबिर, वृक्षारोपणाने रत्नागिरीत ‘सेवा संकल्प अभियान’चा जागर
आरोग्य शिबिर, वृक्षारोपणाने रत्नागिरीत ‘सेवा संकल्प अभियान’चा जागर

आरोग्य शिबिर, वृक्षारोपणाने रत्नागिरीत ‘सेवा संकल्प अभियान’चा जागर

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर महिनाभर विविध उपक्रम; प्रत्येक ग्रामपंचायतीत २०० रोपांची लागवड

रत्नागिरी :
‘सेवा परमो धर्म:’ हा विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या अभियानाचा शुभारंभ गुरुवारपासून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये २०० वृक्षांची लागवड आणि आरोग्य शिबिरांच्या आयोजनाने होणार आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, सर्व विभागांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिंदल यांनी अभियानाच्या नियोजनाचा आढावा घेतला. ‘सेवा सेतू’ उपक्रमांतर्गत तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून प्रलंबित दाखले व विविध शासकीय सेवा नागरिकांना तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
‘सेवा माझे योगदान’ उपक्रमांतर्गत नगरपरिषदा व पंचायत समित्यांनी समुद्रकिनारे, नदीघाट आणि ऐतिहासिक बारवांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवावी. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत तरुण, नवउद्योजक आणि ग्रामीण भागातील संशोधकांसाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’ आयोजित करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये ‘विकसित भारत’ संकल्पनेवर चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन, तर बालविकास विभागामार्फत महिलांसाठी आरोग्य व पोषण शिबिरे आणि बालकांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायतींमध्ये कलापथक आणि पथनाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ‘आशीर्वादाचा दीप’ प्रज्वलित करणे तसेच जनजागृतीसाठी ‘मानवी रांगोळी’चे आयोजन करण्याचेही नियोजन आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग घेऊन समन्वयाने काम करत रत्नागिरी जिल्ह्यात अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जिंदल यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here