दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहासाठी सामंजस्य करार
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहासाठी सामंजस्य करार
माझगाव डॉकची १५ हजार कोटींची गुंतवणूक; ९० हजार रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट
रायगड :
रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पातून राज्यात सुमारे ९० हजार रोजगारनिर्मिती होण्याचे उद्दिष्ट आहे.
या करारानुसार एमडीएलकडून दिघी येथे प्रतिवर्ष किमान १.२ दशलक्ष सकल टनभार (ग्रॉस टनेज) जहाजबांधणी क्षमतेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करण्याची क्षमता विकसित होणार आहे.
महाराष्ट्रात ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे एनशिपएमएल या विशेष उद्देश कंपनीची स्थापना केली आहे. केंद्र शासनाच्या ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकास आराखड्यांतर्गत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असून, ‘मेरीटाईम अमृत काल व्हिजन २०४७’च्या उद्दिष्टांना तो पूरक ठरणार आहे.
दिघीतील प्रकल्पामुळे आधुनिक जहाजबांधणी पायाभूत सुविधा, पूरक उद्योग आणि पुरवठा साखळी परिसंस्था विकसित होण्यास चालना मिळणार आहे. देशांतर्गत जहाजबांधणी क्षमता वाढविणे, तंत्रज्ञान व गुंतवणूक आकर्षित करणे, कुशल रोजगारनिर्मिती तसेच जागतिक सागरी क्षेत्रात भारताची स्पर्धात्मकता वाढविण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, बंदरे व परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एमडीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन आणि एनशिपएमएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पी. यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.