आर्पोरा ‘बर्च’ नाईट क्लबमध्ये आगीचे तांडव !२५ जणांचा मृत्यू, ५० जखमी!

0
228
आर्पोरा 'बर्च’ नाईट क्लबमध्ये आगीचे तांडव !२५ जणांचा मृत्यू, ५० जखमी!
आर्पोरा 'बर्च’ नाईट क्लबमध्ये आगीचे तांडव !२५ जणांचा मृत्यू, ५० जखमी!

आर्पोरा ‘बर्च’ नाईट क्लबमध्ये मृत्युचा सापळा!
आत अडकलेल्या २५ जणांचा मृत्यू, ५० जखमी!

पणजी I प्रतिनिधी
गोव्यासारख्या स्वर्गसदृश पर्यटन राज्यात रविवारी मध्यरात्री घडलेली ही दुर्घटना म्हणजे अक्षरशः मृत्यूच नृत्य. अर्पोरामधील ‘बर्च’ या नाईट क्लब-कम-रेस्टॉरंटमध्ये अचानक उठलेल्या ज्वाळांनी क्षणात नरकाचे रूप धारण केले आणि उजाडत आलेल्या रात्रीचे अंधारात कित्येक कुटुंबांचे आयुष्य कायमचे जळून खाक केले. कोण कल्पनाही करू शकत नाही की आनंदाच्या नावाखाली चालणाऱ्या या क्लबमध्ये काही सेकंदांत अशी किंकाळ्यांनी भरलेली, धुराने दाटलेली, जीवघेणी रात्र उभी राहील. स्वयंपाकघरातील सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्याठिकाणी साठवून ठेवलेल्या रसायनं व फटाक्यांनी ज्वाळांना असा विक्राळ वेग घेतला की, पळण्यासाठी उंबरठा ओलांडण्याचीही संधी अनेकांना मिळाली नाही. जे बाहेर पडण्यासाठी धडपडत होते तेही धुराने गुदमरून कोसळले.

हे पण वाचाकोकण हापूसच्या जीआय मानांकनावर वाद, गुजरातकडून ‘वलसाड हापूस’ची मागणी

या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला असून मृतांमध्ये झारखंड, आसाम, उत्तराखंड आणि नेपाळमधील तरुण कामगारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. बहुतांश मृतदेह नाईट क्लबच्या स्वयंपाकघरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे असून आग वेगाने पसरल्यामुळे त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या आगीनं २५ निरपराधांचे प्राण घेतले. त्यात १९ तरुण कर्मचारी, जे आपापल्या घरच्या जबाबदाऱ्या उचलण्यासाठी, कष्ट करीत होते… आणि चार पर्यटक—जे कदाचित फक्त एक सुंदर, आनंदी रात्र घालवायला आले होते. कित्येकांचे मृतदेह ओळखण्याच्या पलिकडे गेले आहेत. कित्येक जखमी GMC मध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. रडणारे नातेवाईक, हादरलेले पर्यटक, काळवंडलेली भिंत आणि फुटलेल्या काचा—हे दृश्य एखाद्या युद्धानंतरच्या विध्वंसासारखे वाटत होते.

या भीषण आगीत झारखंडमधील रांची येथील मोहित मुंडा (वय १८), प्रदीप महतो (२२) आणि बिनोद महतो (१९) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याशिवाय आसामचा राहुल तांती, उत्तराखंडच्या सतीशसिंग राणा (२६) यांचाही या आगीत मृत्यू झाला आहे. झारखंडमधील एका कुटुंबाचे तर दोन तरुण मुलगे या आगीत मृत्युमुखी पडल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC), बांबोलीम येथे पाच जखमींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य सचिव यतींद्र मराळकर यांनी दिली. त्यापैकी चार पुरुषांना सुमारे १२ टक्के भाजल्याचे जखमा असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, तर २० वर्षीय एका तरुणीला २९ टक्के भाजल्याचे जखमा असून तिचीही प्रकृती नियंत्रणात असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

नाइटक्लबमध्ये कार्यरत असलेला कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जयेश दिवकर यांनी आगीच्या भीषणतेचे वर्णन करताना सांगितले की, “अचानक आगीचा स्फोट झाला आणि काही सेकंदांत संपूर्ण क्लबमध्ये आग पसरली. धुराचे लोट इतके दाट होते की श्वास घेणेही अशक्य झाले. काही लोक बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र स्वयंपाकघरातील अनेक जण अडकून पडले.”

या क्लबमध्ये बेकायदेशीर कारभार सुरू असल्याच्या प्राथमिक संकेतांनी संतापाचा ज्वालामुखी अधिकच उफाळून आला आहे. कागदोपत्री परवानग्या, अग्निसुरक्षा उपाय, सुरक्षा ऑडिट—सगळं काही तोंडी आणि राजकीय कृपेवर चालत होतं का? अशा रसायनांचा, फटाक्यांचा साठा एका क्लबमध्ये कसा काय ठेवला जातो? कोणत्या अधिकाऱ्याने डोळेझाक केली? कोणत्या व्यवस्थापनाने महत्त्वाच्या सुरक्षा नियमांना पायदळी तुडवून निरपराधांचा बळी घेतला? थोडीशी जबाबदारी, थोडीशी दक्षता दाखवली असती तर आज २५ कुटुंबे उध्वस्त झाली नसती.

 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. “गोव्यासाठी हा अत्यंत दु:खद दिवस आहे, दोषींना वाचू देणार नाही,” अशी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया खरी असेल तर आता जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण इथं चूक नाही—गुन्हा झाला आहे. आणि हा गुन्हा २५ कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त करणारा, गोव्याच्या प्रतिमेला काळा ठिपका लावणारा, आणि पर्यटन क्षेत्राच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत जाहीर केली असली तरी पैशाने हे जखमांचे डोंगर भरून निघणार नाहीत. जी व्रणं या रात्रीने तयार केली आहेत ती आयुष्यभर भरून निघायची नाहीत. या दुर्घटनेने गोव्याचा आनंदोत्सव क्षणात मातंगात बदलला आहे.

अरुंद प्रवेश-निर्गम मार्गामुळे अग्निशमन दलाला
अरपोरा नदीच्या बॅकवॉटरमध्ये बांधलेला या क्लबला ‘आयर्लंड क्लब’ असे म्हणतात. मिळालेल्या माहितीनुसार, क्लबमध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग अरुंद आहेत. यामुळे आग लागल्यानंतर अग्निशमन दल क्लबपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यांना 400 मीटर दूर गाडी उभी करावी लागली. यामुळे बचावकार्यात बराच विलंब झाला. अधिकाऱ्यांच्या मते, बहुतेक मृत्यू धुरामुळे आणि गुदमरल्यामुळे झाले. क्लबच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. आग लागण्याच्या कारणांची चौकशी सुरू आहे.
सुरक्षा मानकांवर मोठे प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर क्लबच्या बांधकाम, सुरक्षा आणि अग्निसुरक्षा मानकांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अरपोरा-नगुआ पंचायतचे सरपंच रोशन रेडकर यांनी सांगितले की, क्लब वादात होता. भागीदारांमधील वादामुळे पंचायतीने जागेची पाहणी केली होती आणि क्लब परवानगीशिवाय बांधला असल्याचे आढळले होते. यासाठी पाडण्याची नोटीस (तोडण्याचे नोटीस) देखील जारी करण्यात आले होते, परंतु मालकांच्या उच्च संपर्कामुळे कारवाई थांबवण्यात आली.

प्रत्यक्षदर्शी फातिमा शेख यांच्या मते, आग लागताच आतमध्ये मोठी धावपळ उडाली. त्यावेळी क्लबमध्ये वीकेंड पार्टी सुरू होती आणि सुमारे 100 लोक डान्स फ्लोअरवर होते. धूर आणि ज्वाळा दिसताच, अनेक लोक घाबरून खाली धावले आणि चुकून तळमजल्यावरील स्वयंपाकघरात पोहोचले. तेथे आधीच उपस्थित असलेले कर्मचारीही अडकले. फातिमा यांनी सांगितले,
” बाहेर पडण्याचा मार्ग खूप अरुंद होता, त्यामुळे लोक बाहेर पडू शकले नाहीत. काही मिनिटांतच संपूर्ण क्लब आगीच्या भक्ष्यस्थानी पडला, तिथे पामच्या पानांनी सजावट केली होती, जी लगेच जळून खाक झाली. अनेक लोक कसेबसे बाहेर पडले, पण काहीजण आतच अडकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here