आषाढी वारीच्या तयारीचा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी घेतला आढावा
पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी
पुणे — आषाढी एकादशी यात्रा आणि पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध सुविधांचा आढावा घेतला.
या पाहणी दौऱ्यात गजानन पाटील, उपायुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी शीतल तेली-उगले यांनी पालखी मार्गावरील रस्त्यांची स्थिती, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन तसेच वारकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.
आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी होत असल्याने पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी आवश्यक सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
या पाहणीदरम्यान त्यांनी आळंदी, देहू, हडपसर, सासवड, जेजुरी, वाल्हे आणि निरा येथील पालखी मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्या सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गाच्या पाहणीसाठी रवाना झाल्या.
आषाढी एकादशी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन सज्ज असून वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून तयारी सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.