राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ मध्ये रायगड जिल्ह्याची चमक; खरीवली देशात प्रथम, चांभार्ली द्वितीय
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ मध्ये रायगड जिल्ह्याची चमक; खरीवली देशात प्रथम, चांभार्ली द्वितीय
रायगड, दि. — केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ मध्ये रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
खालापूर तालुक्यातील खरीवली ग्रामपंचायतीने ‘जलसमृद्ध पंचायत’ या गटात देशात प्रथम क्रमांक पटकावला असून चांभार्ली ग्रामपंचायतीने ‘सामाजिक न्याय व सामाजिक सुरक्षा’ या विषयात देशात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
नवी दिल्ली येथे बुधवारी (ता. ३) आयोजित पुरस्कार वितरण समारंभात केंद्रीय राज्यमंत्री राजीव रंजन सिंह आणि एस. पी. सिंह यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, गटविकास अधिकारी संदीप कराड, खरीवलीचे सरपंच सुंदर पवार, उपसरपंच सुशांत विचारे, ग्रामपंचायत अधिकारी मनाली म्हसे, चांभार्लीचे सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच स्वप्नील जांभळे, ग्रामसेवक सीमा राठोड, पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री. तांडेल तसेच सभासद आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्वीकारण्यात आला.
खरीवली ग्रामपंचायतीने जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत देशात प्रथम क्रमांक मिळविला. तर चांभार्ली ग्रामपंचायतीने सामाजिक न्याय, सामाजिक सुरक्षा आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी राबविलेल्या उपक्रमांमुळे राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला.
या यशामुळे रायगड जिल्ह्याच्या ग्रामविकास क्षेत्रातील कार्याला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळाला असून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.