आषाढी एकादशी पालखी सोहळ्याच्या तयारीचा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी घेतला आढावा
आषाढी एकादशी पालखी सोहळ्याच्या तयारीचा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी घेतला आढावा
पुणे — आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध सुविधांचा आढावा घेतला.
यावेळी गजानन पाटील, उपायुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह संबंधित उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शीतल तेली-उगले यांनी पालखी मार्गावरील रस्त्यांची स्थिती, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन तसेच वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.
पालखी सोहळा सुरक्षित, सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
या पाहणी दौऱ्यात त्यांनी आळंदी, देहू, हडपसर, सासवड, जेजुरी, वाल्हे आणि निरा येथील पालखी मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्या सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गाच्या पाहणीसाठी रवाना झाल्या.
आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी होणार असल्याने प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत असून विविध विभागांमध्ये समन्वय साधून सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.