आसाममध्ये भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाला भीषण आग; पाच जवानांचा दुर्दैवी मृत्यू
आसाममध्ये भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाला भीषण आग; पाच जवानांचा दुर्दैवी मृत्यू
जोरहाट (आसाम) : भारतीय हवाई दलाच्या AN-32 मालवाहू विमानाला आसाममधील जोरहाट हवाई लष्करी तळावर उतरल्यानंतर भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. या दुर्घटनेत भारतीय हवाई दलातील पाच जवानांचा मृत्यू झाला असून संपूर्ण देशातून शोक व्यक्त केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरले होते. मात्र त्यानंतर अचानक आग लागल्याने तळावर आपत्कालीन यंत्रणा तातडीने सक्रिय करण्यात आली. अग्निशमन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
भारतीय हवाई दलाने अधिकृत निवेदनाद्वारे अपघाताची पुष्टी करत मृत जवानांची नावे जाहीर केली आहेत. या दुर्घटनेत स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमरम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर भारतीय हवाई दलाने शोक व्यक्त करत म्हटले आहे की, “आसाममधील जोरहाट येथे झालेल्या AN-32 विमान अपघातात आम्ही आपल्या पाच शूर सहकाऱ्यांना गमावले आहे. भारतीय हवाई दल शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले असून तांत्रिक बिघाड अथवा अन्य कारणांचा तपास केला जात आहे.