इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन
ठाणे l प्रतिनिधी
मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगत नागरिकां -साठी विशेष नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन सज्ज असून आवश्यक माहिती देण्यासाठी हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इस्रायल येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
या संदर्भात महाराष्ट्र शासन मंत्रालयातील आपत्कालीन संचालन केंद्राशी (SEOC) संपर्क साधण्यात आला असून, नागरिकांकडून इराण किंवा इस्रायलमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क
साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती मिळवून ती संबंधितांना कळविण्यात येणार आहे.
दरम्यान, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी खालील नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :
- जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे : 022-25301740 / 9372338827
- ठाणे पोलीस नियंत्रण कक्ष : 022-25445353 / 022-25442828 / 022-25443636
- मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई : 9321587143 / 022-22027990
जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


