मुंबईत ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेचा शुभारंभ
मुंबई : वांद्रे, खार आणि सांताक्रुझ पश्चिम (एच पश्चिम वॉर्ड) परिसरातील सुमारे ५५ हजार घरांतील युवकांच्या कौशल्य क्षमतेचा आणि कलाचा अभ्यास करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेचा शुभारंभ सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हे सर्वेक्षण मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभाग यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, भारत हा युवकांचा देश असून तरुण पिढीत जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची मोठी क्षमता आहे. या क्षमतेचा योग्य वापर करून देशाच्या विकासात युवकांचे योगदान वाढविणे आवश्यक आहे.
नरेंद्र मोदी यांनी मांडलेले ‘विकसित भारत २०४७’ हे स्वप्न आणि देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला ‘विकसित महाराष्ट्र’चा रोडमॅप साकार करण्यासाठी कौशल्य विकास हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.
युवकांच्या क्षमतेचा कल जाणून घेण्यासाठी राबविण्यात येणारी ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजना ही देशातील अशा प्रकारची पहिलीच योजना असून रोजगारनिर्मितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याने उचललेले हे पाऊल राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


