उरणमध्ये मोठा राजकीय उलटफेर, भाजपला धक्का; शरद पवार गटाचा नगराध्यक्ष

0
288
उरणमध्ये मोठा राजकीय उलटफेर, भाजपला धक्का; शरद पवार गटाचा नगराध्यक्ष
उरणमध्ये मोठा राजकीय उलटफेर, भाजपला धक्का; शरद पवार गटाचा नगराध्यक्ष

उरणमध्ये मोठा राजकीय उलटफेर, भाजपला धक्का; शरद पवार गटाचा नगराध्यक्ष

पनवेल :
रायगडमधील बहुचर्चित 10 नगरपरिषदांच्या निवडणुकीत शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात खरी टशन होती. त्यातही मुख्य चर्चा होती ती महाड, श्रीवर्धन, रोहा आणि पेण या नगरपरिषदांची. चारही नगरपरिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अपेक्षित अशीच कामगिरी केली आहे. त्यामुळे रायगडमध्ये सुनील तटकरे विनिंग फॅक्टर म्हणून पुन्हा नावारुपाला आले आहेत.
महाडमध्ये सत्ता राष्ट्रवादीची, नगराध्यक्ष शिवसेनेकडे
महाड नगरपरिषद म्हणजे शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचे होम ग्राऊंड. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे खूप महत्त्वाचे होते. मात्र, या नगरपरिषदेत सुनील तटकरे यांनीच बाजी मारली आहे. राष्ट्रवादी-भाजप युतीचे 12 उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे 8 उमेदवार निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील कविस्कर विजयी झाल्यामुळे तटकरेंचे हे स्वप्न भंगले आहे.
श्रीवर्धनमध्ये विजय राष्ट्रवादीचा, नगराध्यक्ष ठाकरेंचा
श्रीवर्धन नगरपरिषद म्हणजे मंत्री आदिती तटकरे यांचा मतदारसंघ. त्यामुळे तटकरेंचे या नगरपरिषदेवर विशेष लक्ष होते. 20 पैकी 15 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे तर भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचे अवघे तीन उमेदवार जिंकले आहेत. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी-भाजप यांची युती होती. तर ठाकरे शिवसेनेचे अतुल चौगुले नगराध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये गड आला पण सिंह गेला, अशी तटकरेंची अवस्था झाली आहे.
रोह्यात राष्ट्रवादीच नंबर 1
रोह्यात शिवसेना-भाजप युतीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस उभी ठाकली होती. तरीही तटकरे यांनी त्यांचा दारूण पराभव करत 20 पैकी 18 जागांवर विजय मिळवला. शिवाय नगरराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वनश्री समीर शेडगे विजयी झाल्या आहेत. उर्वरित दोन जागांवर शिवसेना-भाजपला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
अलिबागचा गड शेकापने राखला
शेतकरी कामगार पक्षाने पुन्हा एकदा अलिबागवरचा दावा पक्का केला आहे. नगराध्यक्षपदी शेकापच्या अक्षया नाईक विजयी झाल्या आहेत. या निमित्ताने त्या नाईक कुटुंबातील सातव्या नगराध्यक्ष ठरणार आहेत. अलिबागमध्ये शेकाप आणि काँग्रेस एकत्र आले होते. 20 पैकी 16 उमेदवार शेकापचे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसचा एक उमेदवार तर शिवसेना-भाजप युतीकडून भाजपचे शहराध्यक्ष अंकीत बंगेरा विजयी झाले आहेत. शिवसेना उबाठाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.
कर्जतवर राष्ट्रवादी-ठाकरे गटाचा झेंडा
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने आघाडी करत कर्जत नगरपरिषदेत अनुक्रमा 8 आणि 4 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. 21 सदस्यांच्या नगरपरिषदेत शिवसेनेला 7, भाजपला एक आणि एका जागी अपक्ष उमेदवाराला यश मिळाले आहे. तर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पुष्पा दगडे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत.
पेणमध्ये भाजप-राष्ट्रवादीची सत्ता
पेण नगरपरिषदेतील 24 पैकी 12 जागांवर भाजप तर 5 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. शिवाय शृंगार पुरे गटाचे 3 आणि धारकर गटाचे 2 दोन उमेदवार विजयी झाले आहेत. पेणमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते. नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रीतम ललित पाटील विजयी झाल्या आहेत.
उरण नगरपरिषद भाजपकडे, नगराध्यक्ष मविआचा
उरण नगरपरिषदेची निवडणूक अटीतटीची झाली होती. कारण इथे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी (शिवसेना उबाठा, काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे) अशी लढत होती. 21 पैकी भाजपला 12 तर शिवसेना ठाकरे गटाला 7, शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर नगराध्यक्षपदी शरद पवार गटाच्या भावना घाणेकर विजयी झाल्या आहेत.
माथेरानवर युतीचे वर्चस्व
शिवसेना, भाजप आणि रिपाइं यांच्या युतीने माथेरानमध्ये 15 जागांवर विजय मिळवला आहे. 20 पैकी 12 जागांवर शिवसेना आणि 12 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे यांच्या शिवराष्ट्र पॅनेलला अनुक्रमे 4 आणि एक अशा पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर नगराध्यक्षपदी शिवसेनेचे चंद्रकांत चौधरी विजयी झाले आहेत.
खोपोलीत शिंदेंचा दबदबा
खोपोली नगरपरिषदेमध्ये 31 पैकी शिवसेनेने सर्वाधिक जागा म्हणजे 14 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेने खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने 7 जागांवर विजय मिळवला आहे. भाजप आणि शेकापने प्रत्येकी 4 जागा मिळवल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एक तर अपक्ष उमेदवाराने एका जागेवर विजय मिळवला आहे. खोपोलीतही शिवसेना-भाजप युती होती. युतीने एकूण 31 पैकी 18 जागा मिळवल्या आहेत. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे कुलदीपक रामदास शेंडे विजया झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here