नवी मुंबई महापालिकेतही शिवसेनेचा भगवा फडकणार; ऐरोलीत शिवसैनिकांना सज्जतेचे आवाहन
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ऐरोली विभागात आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात नगरपरिषदांप्रमाणेच महापालिकेतही शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन करण्यात आले. नगरपालिका व नगर परिषद निवडणुकांत महाविकास आघाडीला एकत्रित मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा शिवसेनेला मिळाल्याने नवी मुंबईत पक्षाची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट झाले असून, गाफील न राहता सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन शिवसैनिकांना करण्यात आले.

यावेळी विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यात नामदेव भगत, रमाकांत म्हात्रे, मनोज हळदणकर, विजय माने व शीतल कचरे यांचा समावेश होता. ‘असली शिवसेना कोणाची’ याचा फैसला जनतेने केला असून, लोकसभा, विधानसभा व नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिकेतही महायुतीचाच भगवा फडकणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नवी मुंबईसाठी सिडको घरे, एफएसआय वाढ, टोल नाके हटवणे, पूल-रस्ते प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विमानतळ व ‘तिसरी मुंबई’ ग्रोथ सेंटर हे गेम चेंजर ठरत असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. या मेळाव्यास खासदार नरेश म्हस्के, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


