एकाच उमेदवाराचे तीन पक्षांतून अर्ज; गुजरात निवडणुकीत अनोखी घडामोड
दाहोद (प्रतिनिधी): गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी एक अनपेक्षित आणि चर्चेचा विषय ठरलेली घटना समोर आली आहे. एका उमेदवाराने एकाच जागेसाठी तीन प्रमुख पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरत सिंहवाखला यांनी १० एप्रिल रोजी आम आदमी पार्टी (आप) कडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी ११ एप्रिल रोजी त्याच जागेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) या पक्षांकडूनही स्वतंत्र अर्ज सादर केले.
दाहोद जिल्हा पंचायतीतील पिपेरो जागेसाठी दाखल करण्यात आलेल्या या अर्जांमुळे संबंधित उमेदवाराची अधिकृत पक्षीय भूमिका काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक प्रक्रियेत अशा प्रकारची घटना अत्यंत दुर्मिळ मानली जात असून राज्याच्या राजकीय इतिहासातही हा प्रकार अभूतपूर्व असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावर निवडणूक अधिकाऱ्यांकडून काय भूमिका घेतली जाते आणि कोणता अर्ज ग्राह्य धरला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


