एचडीएफसी बँकेच्या अर्धवेळ अध्यक्षपदी माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची नियुक्ती

0
23

एचडीएफसी बँकेच्या अर्धवेळ अध्यक्षपदी माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची नियुक्ती

मुंबई, दि. १ : एचडीएफसी बँकेने भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची अर्धवेळ (गैर-कार्यकारी) अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
१९८४ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेले राजीव कुमार यांनी भारताचे २५ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्य केले आहे. यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) मंजुरी आणि भागधारकांच्या संमतीच्या अधीन राहून, ३० जून २०२६ पासून तीन वर्षांसाठी अर्धवेळ गैर-कार्यकारी अध्यक्ष तसेच चार वर्षांसाठी अतिरिक्त स्वतंत्र संचालक म्हणून त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
६६ वर्षीय राजीव कुमार यांना बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील व्यापक अनुभव असून, वित्तीय सेवा सचिव म्हणून कार्यरत असताना त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सुधारणांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘4R’ धोरणामुळे बँकिंग क्षेत्रातील सुधारणा आणि काही कमकुवत बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पुढे सरकली होती.
मार्च महिन्यात नैतिक मतभेदांमुळे पदाचा राजीनामा दिलेल्या अतानु चक्रवर्ती यांच्या जागी राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असून, तोपर्यंत केकी मिस्त्री यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here